जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचा कार्यक्रम सोमवारी २ जून रोजी सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात नागरिकांनी त्यांच्या विविध समस्या आणि प्रश्नांसंदर्भात एकूण ९५ अर्ज दाखल केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे, तहसीलदार (संजय गांधी योजनांतर्गत) डॉ. उमा ढेकळे, नायब तहसीलदार (करमणूक शाखा) राहुल सोनवणे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. लोकशाही दिनात प्राप्त झालेल्या विविध प्रश्नांसंदर्भात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी तात्काळ निराकरण करण्याचे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. प्राप्त अर्जांचा विभागवार सविस्तर आढावा घेऊन, त्यावर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यामुळे नागरिकांच्या समस्यांचे जलद गतीने निवारण होण्यास मदत होणार असून, प्रशासनाप्रती विश्वास वाढेल अशी अपेक्षा आहे.