मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर शहरात भरदिवसा तब्बल सव्वा तीन लाखांची रुपयांची धाडसी चोरी झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. चोरीच्या घटनेने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून, पोलिस प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी होत आहे.
घटनाबाबत मिळालेली माहिती अशी की; निमखेडी खुर्द येथील रहिवासी रतन कडू घोडकी हे शेती व्यवसायासोबतच प्लंबिंगचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. दिनांक १२ जून २०२५रोजी ते मुक्ताईनगर शहरात प्लॉट खरेदीसाठी लागणारी रक्कम बँकेतून काढण्यासाठी आले होते. सकाळी सुमारे ११ वाजता त्यांनी प्रथम संत ज्ञानेश्वर पतसंस्थेतून २ लाख २५ हजार रुपये रोख रक्कम काढली. त्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या मुक्ताईनगर शाखेतून दुपारी 12.55 वाजता १ लाख रुपये रोख काढले. एकूण सव्वा तीन लाख रुपये त्यांनी जवळच्या कापडी पिशवीत ठेवले होते.
बँकेच्या बाहेर आल्यानंतर एक अनोळखी इसम त्यांना म्हणाला की, “तुमचे खिशातील पैसे खाली पडले आहेत.” त्यांनी मोटरसायकल थांबवून खाली पाहिलं आणि खरेच थोडे पैसे जमिनीवर दिसल्याने पैसे उचलण्यासाठी खाली उतरले. त्या दरम्यान त्यांची पैशांची पिशवी मोटरसायकलच्या हॅंडलला लटकवलेली होती. त्याच वेळी एका दुसऱ्या मोटरसायकलवरील व्यक्तीने ती पिशवी घेऊन पळ काढला. रतन घोडकी यांनी त्याचा पाठलाग करून बोदवड चौफुलीपर्यंत गेले, पण चोरटे सापडले नाहीत. अखेर त्यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अनोलखी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेत पुढील तपास सुरू केला आहे.
या प्रकारामुळे मुक्ताईनगर शहरात भरदिवसा झालेल्या लुटीमुळे नागरीकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून, पोलिस प्रशासनाने तत्काळ तपास पूर्ण करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.