जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव एमआयडीसीतील रॉयल फर्निचर समोर रिक्षाची वाट बघत असलेल्या तरूणाला भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी १४ जून रोजी रात्री ९ वाजता घडली आहे. या संदर्भात मंगळवारी १७ जून रोजी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मिर्झा मोहसीन बेग मोहमद बेग (वय-३८, रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) हा तरुण १४ जून रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास एमआयडीसीतील रॉयल फर्निचर शोरूम समोर रिक्षाची वाट बघत उभा होता. त्यावेळी एमआयडीसीकडून येणारी दुचाकी क्रमांक (एमएच १९ इसी ९४५४) त्यांना जोरदार धडक दिली. त्यामुळे तरूणाच्या पायाला आणि हाताला गंभीर दुखापत झाली. दरम्यान या घटनेसंदर्भात मिर्झा बेग यांनी एमआयडीसी पोलिसात याबाबत फिर्याद दिली. त्यानुसार मंगळवारी १७ जून रोजी रात्री १० वाजता दुचाकीवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे करीत आहे.