धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावाजवळील तापी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहतूकदारांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकाला गुरुवारी १२ जून सकाळी ८ वाजता धक्कादायक अनुभवाला सामोरे जावे लागले. वाळू माफियांनी पथकाशी धक्काबुक्की करत ट्रॅक्टरमधील वाळू जागेवरच खाली करून वाहनांसह पळ काढला. याप्रकरणी रात्री १० वाजता पाच जणांविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावाजवळ तापी नदीतून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची गोपनीय माहिती धरणगाव महसूल पथकाला मिळाली होती. त्यानुसार, पथकाने गुरुवारी १२ जून रोजी सकाळी आठ वाजता अचानक छापा टाकला. त्यावेळी गिरणा नदीपात्रात पाच ट्रॅक्टरमधून अवैधपणे वाळू भरून तिची वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले. महसूल पथकाने कारवाई करण्याचा प्रयत्न करताच, ट्रॅक्टरचे मालक आणि चालक यांनी पथकाशी धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. याच संधीचा फायदा घेत त्यांनी ट्रॅक्टरमधील वाळू जागेवरच खाली केली आणि ट्रॅक्टर व ट्रॉली घेऊन घटनास्थळावरून पळ काढला.
या घटनेमुळे महसूल पथकाला रिकाम्या हाती परतावे लागले. या संदर्भात मनोहर शिवराम बाविस्कर (रा. खोटे नगर, जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, ट्रॅक्टर मालक गंगाराम शामराव सोनवणे, दिनेश भागवत नन्नवरे, दीपक विजय सपकाळे, विशाल विजय सपकाळे आणि ऋषी उर्फ गुड्डू साळुंखे (सर्व रा. बांभोरी, ता. धरणगाव) यांच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार सुनील लोहार करत आहेत.