फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । फैजपूरचे माजी प्रभारी नगराध्यक्ष कलिमखान मन्यार यांच्या कुटुंबाने इस्लाम धर्मातील प्रेषित पैगंबर मोहम्मद सल्लला वालैव सल्लम यांच्या शिकवणीला अनुसरून अत्यंत साध्या पद्धतीने आदर्श विवाह लावून एक प्रेरणादायी पायंडा पाडला आहे. आपल्या मुलाचा साखरपुडा कार्यक्रमातच विवाह (निकाह) संपन्न केल्याने मुस्लिम समाजात या घटनेचे मोठे कौतुक होत आहे आणि हा विवाह समाजासाठी एक आदर्श ठरला आहे.
कमी खर्चात, कमी वेळेत विवाह ही काळाची गरज
अनिष्ट चालीरीतींना फाटा देऊन कमी वेळेत आणि कमी खर्चात विवाह कार्य पार पाडणे, हे सध्याच्या धावपळीच्या आणि महागाईच्या काळात अत्यंत आवश्यक आहे. समाज परिवर्तन आणि विकासाच्या प्रवाहात समाजाला आणण्यासाठी अनेक समाजांमध्ये सामूहिक विवाहांचे आयोजन केले जाते. प्रेषित पैगंबर मोहम्मद सल्लला वालैव सल्लम यांच्या शिकवणीनुसार, इस्लाममध्ये निकाह सोपा आहे आणि सर्वात कमी खर्चात होणारा निकाह सर्वोत्तम मानला जातो. याच शिकवणीला अनुसरून हा आदर्श विवाह पार पडला.
साखरपुड्यातच विवाह संपन्न
रविवारी, माजी प्रभारी नगराध्यक्ष कलिमखान मन्यार यांचे चिरंजीव दानिश खान यांचा निंभोरा ता. रावेर येथील शेख करीम मन्यार यांची नात आणि इस्माईल शेख मन्यार यांची कन्या रुकसार बी यांच्याशी साखरपुड्याचा कार्यक्रम होता. यावेळी वर आणि वधू पक्षांनी साखरपुड्यातच विवाह करण्याचा प्रस्ताव ठेवला. दोन्ही बाजूंच्या संमतीने, मोजक्या लोकांच्या उपस्थितीत दानिश खान आणि रुकसार बी यांचा विवाह साखरपुड्यातच पार पडला.
समाजासमोर एक नवा आदर्श
पद-प्रतिष्ठा आणि मोठ्या जल्लोषात मुलाचे विवाह करण्याची क्षमता असूनही, समाजकारण आणि राजकारण करताना आपल्याकडून एक आदर्श पायंडा ठेवला जावा आणि समाजात प्रेरणा मिळावी, अशा दूरदृष्टीने कलिमखान मन्यार यांनी हा निर्णय घेतला. साखरपुड्यातच विवाह आटोपल्याने या साध्या पद्धतीने पार पडलेल्या आदर्श विवाहाचे सर्वत्र कौतुक होत आहे, शिवाय मुस्लिम समाजात यामुळे एक नवी प्रेरणा मिळाली आहे.
मान्यवरांची उपस्थिती आणि शुभेच्छा
या आदर्श विवाहप्रसंगी माजी आमदार शिरिष चौधरी, युवा नेते धनंजय चौधरी, प्रल्हाद बोनडे, दिगंबर चौधरी, असगर सैय्यद, माजी उपनगराध्यक्ष शेख कुर्बान, माजी नगरसेवक महेबूब पिंजारी, सावद्याचे माजी नगरसेवक फिरोज पठाण, राजीव बोरसे, फैजपूरचे काँग्रेस शहर अध्यक्ष शेख रियाज, सैय्यद कौसर अली, शेख इरफान शेख इकबाल, जलील शेख, शेख महेमुद शेख हसन (रावेर), शेख इरफान (चिनावल), सईदखान रशीदखान, शेख शाकिर, वाय डी पाटील, विवेक बोनडे, दिनेश पाटील आणि गावातील नागरिक व मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांचे आभार हाजी शेख करीम मन्यार यांनी मानले.