रावेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर पोलीस स्टेशन हद्दीतून मोटारसायकल चोरणाऱ्या एका चोरट्यास अटक करण्यात रावेर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत. पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या कार्यपद्धतीचे यामुळे नागरिकांमधून कौतुक होत आहे.
चोरीचा गुन्हा आणि तपास
५ जून रोजी नागझिरी मोहल्ल्यातील रहिवासी शेख अकील शेख कलीम यांची हिरो होंडा कंपनीची सुपर स्प्लेंडर (लाल रंग – क्र. MH 19 CS 0392) ही मोटारसायकल रावेर ते रसलपूर रोडवरील हॉटेल S2 समोरून अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याप्रकरणी रावेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. गुन्ह्याच्या ठिकाणावरील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करून आरोपीची ओळख पटवण्यात आली.
दोन मोटारसायकली हस्तगत
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सुशील सुधाकर तायडे (वय ४४, रा. रसलपूर, ता. रावेर) यास ताब्यात घेऊन सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान, चोरीस गेलेली सुपर स्प्लेंडर (MH 19 CS 0392) आणि दुसरी एक हिरो होंडा स्प्लेंडर प्लस (काळा रंग – क्र. MP 68 ME 5954) अशा एकूण दोन मोटारसायकली आरोपीच्या ताब्यातून हस्तगत करण्यात आल्या आहेत.
पोलिसांच्या पथकाचे कौतुक
ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. सिकंदर तडवी, पोना. कल्पेश आमोदकर, पोकॉ. सचिन घुगे, विशाल पाटील, प्रमोद पाटील, महेश मोगरे, श्रीकांत चव्हाण, सुकेश तडवी, विकारुद्दीन शेख यांच्या पथकाने केली आहे. या कारवाईमुळे रावेरमधील चोरीच्या घटनांवर आळा बसेल, अशी नागरिकांना अपेक्षा असून, रावेर पोलिसांच्या कामगिरीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.