सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र शासनाने २०२५-२६ शैक्षणिक वर्षापासून लागू केलेल्या ११ वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे समोर आले आहे. मोठे वाघोदे येथील मुलींच्या विज्ञान शाखेत प्रवेश मेरिट यादीमुळे रखडल्याने पालकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. आपल्या मुलांचे शिक्षण धोक्यात येईल या भीतीपोटी संतप्त पालकांनी थेट शाळा गाठून वर्गाला कुलूप लावले आणि स्थानिक शाळेतच प्रवेश देण्याची मागणी केली.
पालकांनी आपली आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने मुलांना दूरच्या शहरात शिक्षणासाठी पाठवणे शक्य नसल्याचे सांगितले. अनेक विद्यार्थी याच विद्यालयात ५ वी पासून शिक्षण घेत असताना, आता त्यांनाच प्रवेश का मिळत नाही, असा सवाल पालकांनी उपस्थित केला.
यावेळी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक आणि शिक्षकांनी पालकांशी चर्चा करून त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. संस्थेचे पदाधिकारी श्री. कुलदीप पाटील आणि पी. एल. महाजन यांनी तातडीने विद्यालयात येऊन परिस्थितीचा आढावा घेतला. संस्थेचे सचिव किशोर पाटील यांनी आमदार चंद्रकांत पाटील आणि मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधून या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे पालकांना सांगितले.
विद्यार्थ्यांचे प्रवेश याच विद्यालयात व्हावेत यासाठी सकारात्मक प्रयत्न करत असल्याचे आश्वासन संस्थेकडून देण्यात आले. मात्र, अनेक महिला आणि पालकांनी यावर समाधान व्यक्त न करता, थेट आमदारांना भेटून आपली व्यथा मांडण्याचा निर्धार केला आहे. या संपूर्ण गोंधळात शिक्षकांनीही पालकांना विश्वास दिला की ते त्यांच्यासोबत असून शिक्षणासाठी सर्वतोपरी सहकार्य करतील. या घडामोडींमुळे ग्रामीण भागातील ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या मर्यादा स्पष्ट झाल्या असून, शासनाने या पद्धतीत सुधारणा करणे गरजेचे आहे अशी मागणी पालक आणि स्थानिक नागरिकांतून होत आहे.