धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पत्नी व सासरच्या मंडळींकडून पैशांची मागणी घटस्फोट देण्याची धमकी आणि मानसिक त्रासाला कंटाळून दोनगाव येथील तरूणाने धावत्या रेल्वेखाली येवून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बुधवारी ३०जुलै रोजी दुपारी १२.३० वाजता तरूणाच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात मयताची पत्नी व सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेमंत अरूण पाटील वय २८ रा. दोनगाव ता.धरणगाव असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे.
धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथे हेमंत पाटील हा तरुण आपल्या कुटुंबीयासह वास्तव्याला होता. त्याची पत्नी गायत्री हेमंत पाटील हे काही दिवसांपासून माहेरी मंगरूळ येथे निघून गेली होती. दरम्यान त्यांच्यात वाद असल्या कारणामुळे पत्नी गायत्री पाटील, सासरे बाळू भीमराव बोरसे, सासू रेखाबाई बाळू बोरसे रा. मंगरूळ ता. अमळनेर यांनी वेळोवेळी हेमंत पाटील यांना धमकी व मानसिक त्रास दिला तसेच पत्नी गायत्री पाटील हिने “घटस्फोट घे नाहीतर, पंधरा लाख रुपये दे” अशी मागणी करू लागले या धमक्यांना आणि मानसिक त्रासाला कंटाळून हेमंत पाटील याने २२ जुलै रोजी घरातून निघून गेला. त्यानंतर त्याने पाळधी येथील एका धावत्या रेल्वेखाली आपली जीवन यात्रा संपविली. दरम्यान सुरुवातीला मृतदेह अनोळखी होता दरम्यान पोलिसांनी तपास लावून हेमंत पाटील याचाच मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. हेमंत पाटील यांचे वडील अरुण विश्राम पाटील यांनी यासंदर्भात धरणगाव धाव घेतली. मुलगा हेमंत याने पत्नी आणि सासू-सासर्यांच्या जांचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची फिर्याद देण्यात आली. त्यानुसार मयत हेमंत पाटील यांची पत्नी गायत्री हेमंत पाटील, सासरे बाळू भीमराव बोरसे आणि सासू रेखाबाई बाळू बोरसे या तीन जणांविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत खंडारे करीत आहे.