यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड यांच्या बेजबाबदार व मनमानी कारभाराविरोधात नागरिकांमध्ये व स्थानिक लोकप्रतिनिधींमध्ये तीव्र संताप पसरला आहे. त्यांच्या असभ्य वागणुकीमुळे प्रशासनावर अविश्वासाची छाया पडत असून, तातडीने त्यांची बदली करण्यात यावी, अशी एकमुखी मागणी महायुतीतील शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या शिष्टमंडळाने केली आहे.
या मागणीसाठी जिल्हा उपसंघटक नितिन सोनार, तालुका प्रमुख राजू काटोके (शिवसेना), युवक जिल्हा उपाध्यक्ष जुगल पाटील व आकाश चोपडे (राष्ट्रवादी), तसेच इतर प्रमुख पदाधिकारी यावल पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी बी. का. पवार यांची भेट घेतली. या वेळी गटविकास अधिकारी डॉ. गायकवाड यांच्या अपमानास्पद व अशोभनीय वर्तनाचा मुद्दा उपस्थित करून, त्यांचे वर्तन केवळ सर्वसामान्य नागरिकांपुरते मर्यादित नसून पत्रकारांनाही त्यांनी अशिष्ट भाषेत बोलावल्याची तक्रार करण्यात आली.
या अधिकाऱ्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करत एकतर्फी निर्णय घेणे, सहकार्य न करणे आणि शासकीय प्रक्रियेचा अवमान करणे, हे प्रकार सर्रास सुरू असल्याचे आरोप शिष्टमंडळाने मांडले. त्यामुळे यावल पंचायत समितीच्या प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, अशा अधिकाऱ्यांना थांबविणे ही काळाची गरज असल्याचे मत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
डॉ. गायकवाड यांच्याविरोधातील तक्रारींची दखल घेत यावल पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी बी. का. पवार यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले व संबंधित बाबींचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर केला जाईल, असे आश्वासन दिले. मात्र जर यावर त्वरित कार्यवाही झाली नाही, तर शिवसेना व राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या शिष्टमंडळात नितीन सोनार, जुगल पाटील, राजू काटोके, आकाश चोपडे, सागर सपकाळे, राजू सपकाळे, किरण महाजन, मनोहर पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते. गटविकास अधिकारी यांची कार्यपद्धती ही लोकशाही प्रक्रियेच्या विरोधात असल्याचा ठपका यावेळी ठेवण्यात आला.