धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील धानोरा गावात महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे सोमवारी २ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास विद्युत पोलमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने एका बैलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ज्यामुळे एका गरीब शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
धरणगाव तालुक्यातील धानोरे गावात राहणारे सतीश पंडित पाटील (वय ५५) हे शेतकरी आहेत. त्यांच्या शेतात बैलजोडीच्या मदतीने चारा कुट्टी वाहतुकीचे काम सुरू होते. घटनेच्या दिवशी, सोमवारी २ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास सतीश पाटील यांचा मुलगा राहुल पाटील आणि भाचा महेंद्र पाटील हे दोघे चारा कुट्टी वाहतुकीची शेवटची खेप बैलजोडीने घेऊन जात होते. प्लॉट भागातील खळवाडीजवळून जात असताना, विद्युत प्रवाह उतरलेल्या एका धोकादायक इलेक्ट्रिक पोलला बैलाचा धक्का लागला आणि बैलाचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये महावितरण कंपनीविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. कारण, धक्कादायक बाब म्हणजे, शेतकरी सतीश पाटील यांनी यापूर्वीही महावितरण कंपनीला या इलेक्ट्रिक पोलमध्ये विद्युत प्रवाह उतरला असल्याची माहिती दिली होती. परंतु, महावितरण कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या गंभीर समस्येकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले. त्यांच्या याच हलगर्जीपणामुळे आणि निष्काळजीपणामुळे ही जीवघेणी दुर्घटना घडली आहे, असा आरोप ग्रामस्थ करत आहेत.
आधीच विविध कारणांमुळे कर्जबाजारी असलेल्या शेतकरी सतीश पाटील यांचा पेरणीच्या दिवसांत अचानक बैल गेल्याने त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. शेती कामांसाठी अत्यंत आवश्यक असलेला बैल गमावल्यामुळे त्यांच्यापुढे आता उदरनिर्वाहाचे आणि शेतीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. या नुकसानीची भरपाई महावितरण कंपनीने त्वरित द्यावी, अशी मागणी शेतकरी आणि स्थानिक नागरिक प्रशासनाकडे करत आहेत. धरणगाव पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील कारवाई करत आहेत.