मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहराजवळून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे लक्झरी बस व ट्रकचा भीषण अपघात झाला असून यात दोन ठार तर सुमारे वीस प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, आज पहाटे सिहोरी ट्रॅव्हल या कंपनीची लक्झरी बस सुरतहून निघून बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथे जात होती. कोथळी गावाला लागून असणाऱ्या हायवे उड्डाण पुलावर या बसने समोरून जात असलेल्या ट्रकला जोरदार धडका दिली. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून सुमारे वीस प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात सकाळी चार वाजेच्या सुमारास घडला.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरिक्षक नागेश मोहिते यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. जखमींना उपजिल्हा रूग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पर्यंत मृत झालेल्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू होते. तसेच या संदर्भात मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्ह नोंदविण्यात आला होता.