अमळनेर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील तरुणांमधील वाढती व्यसनाधीनता आणि गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी अमळनेर पोलीस स्टेशनकडून सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून, गुरूवारी ५ जून रोजी अमळनेर पोलिसांनी गावठी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस बाळगणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली.
या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना गोपनीय बातमीदाराकडून मिळाली होती. अमळनेर शहरातील मारवड रोडवरील क्रीडा संकुलाच्या पाठीमागे भिंतीलगत एक इसम गावठी पिस्तूल बाळगून असल्याची माहिती मिळताच, निकम यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले.
पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार, पोलीस नाईक सिद्धांत सिसोदे, पोलीस कॉन्स्टेबल निलेश मोरे आणि पोलीस कॉन्स्टेबल विनोद संदानशिव यांच्या पथकाने तात्काळ बातमीच्या ठिकाणी धाव घेतली. पोलिसांना पाहताच संशयित व्यक्ती पळू लागला, परंतु पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला सायंकाळी ७:३० वाजता पकडले.
पकडलेल्या इसमाकडे चौकशी केली असता त्याने आपले नाव चेतन उर्फ सत्तु किरण धोबी (रा. शिवाजी नगर, पैलाड, अमळनेर) असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या कमरेला एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस आढळून आले. पिस्तूलचा परवाना विचारला असता, त्याच्याकडे परवाना नसल्याचे त्याने सांगितले. या प्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे. अमळनेर शहरात कोणी पिस्तूल किंवा बंदुकीचा धाक दाखवून धमकी देत असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. असे आवाहन पोलीस निरीक्षक निकम यांनी नागरिकांना केले आहे