जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगावातील नवीन बसस्थानक परिसरात सोमवारी (२ जून) दुपारी एक धक्कादायक घटना घडली. रुग्णालयातून उपचार घेऊन गावी परतण्यासाठी बसमध्ये चढत असलेल्या काशिनाथ गणपत डोंगरे (७९, रा. टाकरखेडा, ता. जामनेर) यांचा खिसा कापून चोरट्याने तब्बल ५० हजार रुपये लांबवले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टाकरखेडा येथील रहिवासी असलेले काशिनाथ डोंगरे हे आपल्या पत्नीसह नाशिक येथे उपचारासाठी गेले होते. उपचार घेऊन परतल्यानंतर ते जळगाव बसस्थानकात पोहोचले. दुपारी ते जळगाव ते जामनेर या बसमध्ये चढत असताना प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या बंडीचा (सदऱ्याचा) खिसा कापला आणि त्यातील ५० हजार रुपयांची रोकड लंपास केली.
बसमध्ये सीटवर बसल्यानंतर काशिनाथ डोंगरे यांनी खिशाला हात लावला असता, खिसा कापलेला असल्याचे आणि पैसे गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला, परंतु खिसा कापलेला असल्याने पैसे चोरीला गेल्याची त्यांची खात्री पटली.
या प्रकरणी काशिनाथ डोंगरे यांनी तात्काळ जिल्हापेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काशिनाथ डोंगरे यांच्या पत्नीने पोलिसांना माहिती देताना सांगितले की, एक धष्टपुष्ट व्यक्ती त्यांना धक्का देऊन काशिनाथ डोंगरे यांच्यामागून गर्दीत बसमध्ये चढत होता. याच व्यक्तीने ही रक्कम लांबवली असावी, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.