भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आंतरराष्ट्रीय योग दिनाचा यंदा ११ वा वर्धापनदिन असून, “एक पृथ्वी, एक स्वास्थ्य के लिए योग” या संकल्पनेनुसार शनिवार, २१ जून रोजी सकाळी ७.०० वाजता भुसावळ रेल्वे स्थानकासमोर, रेल्वे क्रीडांगण येथे भव्य योगाभ्यास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन आयुष मंत्रालय, युवा कार्य व क्रीडा मंत्रालय (भारत सरकार), मध्य रेल्वे विभाग भुसावळ आणि जिल्हा प्रशासन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. कार्यक्रमात केंद्र शासनाने निर्देशित केलेल्या कॉमन योगा प्रोटोकॉलनुसार सामूहिक योगाभ्यास होणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. तसेच, सर्व शासकीय विभागांतील वर्ग १ व वर्ग २ अधिकारी यांचीही उपस्थिती अनिवार्य असणार आहे.
कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे यात १० हजार नागरिकांच्या सहभागाची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने सर्व नागरिकांना आपल्या कुटुंबीयांसह सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींचे वय किमान १० वर्षे ते कमाल ६० वर्षे वयोगटातील असावे. योगाभ्यासासाठी सैल आणि आरामदायक पोशाख परिधान करावा, तसेच स्वतःची योगा मॅट किंवा चटई सोबत आणण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. कार्यक्रमस्थळी पिण्याच्या पाण्याची आणि प्राथमिक उपचारांची व्यवस्था करण्यात आली आहे. योग ही प्राचीन भारतीय परंपरेची देणगी असून, सर्वांनी मिळून या उपक्रमात सहभाग घ्यावा आणि जनसामान्यांमध्ये योगाचे महत्त्व पोहोचवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.