जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । परदेशात मुलाकडे गेलेल्या मोहाडी रोडवरील काळे नगरातील एकाचे बंद घर फोडून घरातून सव्वा लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना रविवारी १ जून रोजी सकाळी ९ वाजता समोर आली आहे. या संदर्भात रविवारी १ जून रोजी रात्री ८.३० वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
अधिक माहिती अशी की, लीलाधर शांताराम खंबायत (वय-५१, रा. काळे नगर, मोहाडी रोड जळगाव) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. १५ मे रोजी ते १ जूनच्या कालावधीमध्ये लीलाधर खंबायत हे त्यांच्या मुलगा ऑस्ट्रेलियाला असल्याने त्यांच्याकडे गेले होते. त्यावेळी त्यांचे घर बंद होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद घर असल्याचा फायदा घेत घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातून सोन्याची चैन आणि सोन्याच्या अंगठ्या असा एकूण सव्वा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना उघडकीला आल्यानंतर लिलाधर खंबायत यांनी रविवारी १ जून रोजी रात्री ८.३० वाजता रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपस सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप वाघ करीत आहेत.