जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे! गेल्या ५३ वर्षांपासून सेवेत असलेली आणि गोंदिया-कोल्हापूर दरम्यान दररोज धावणारी लोकप्रिय महाराष्ट्र एक्सप्रेस (गाडी क्रमांक ११०४०) आता अत्याधुनिक एलएचबी (लिंक हॉफमॅन बुश) कोचेससह प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. यामुळे हा प्रवास अधिक सुरक्षित, वेगवान आणि आरामदायक होणार आहे.
हा ऐतिहासिक बदल घडवून आणण्यात जळगावच्या खासदार स्मिताताई वाघ यांची अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. त्यांनी थेट रेल्वेमंत्री श्री. अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन महाराष्ट्र एक्सप्रेसच्या रॅकसाठी एलएचबी कोचेस उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून, १ जून २०२५ पासून नव्या एलएचबी रॅकसह ही गाडी प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे.
महाराष्ट्र एक्सप्रेस ही गाडी १ नोव्हेंबर १९७१ पासून प्रवाशांच्या सेवेत आहे, म्हणजेच जवळपास ५३ वर्षांनंतर या लोकप्रिय गाडीमध्ये हा आधुनिक आणि मोठा बदल खासदार स्मिताताई वाघ यांच्या माध्यमातून झाला आहे. या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून, ३ जून २०२५ रोजी जळगाव रेल्वे स्थानकावर महाराष्ट्र एक्सप्रेसच्या लोको पायलटचे फुलांनी स्वागत करून आणि पेढे वाटप करून मोठा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
या स्वागत सोहळ्यावेळी जळगाव भाजप रेल्वे प्रकोष्ठ आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. याप्रसंगी प्रमुख उपस्थितांमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष भैरवी वाघ पलांडे, माजी महापौर सीमाताई भोळे, भाजप रेल्वे प्रकोष्ठाचे जिल्हाध्यक्ष प्रतीक शेठ, स्टेशन उपाधीक्षक अरुण नाफडे आणि DRUCC सदस्य महेंद्र कोठारी यांचा समावेश होता.
या सर्व मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवून महाराष्ट्र एक्सप्रेसला नव्या रूपात पुढील प्रवासासाठी रवाना केले. उपस्थित कार्यकर्त्यांनी खासदार स्मिताताई वाघ यांच्या दूरदृष्टी, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि केंद्र सरकारसोबतच्या उत्तम समन्वयामुळेच उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना ही मोठी आणि अत्याधुनिक सुविधा मिळाल्याचे नमूद केले. या बदलामुळे प्रवाशांना आता सुखकर आणि सुरक्षित प्रवास अनुभवता येणार आहे.