जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील इस्मामपूरा भागात अवैधपणे गोमांसची विक्री करणाऱ्यांवर शनीपेठ पोलीसांनी कारवाई केली. त्यावेळी कारवाईसाठी आलेल्या महिला पोलीस निरीक्षकांच्या अंगावर धावून येत दोन महिलांनी धक्काबुक्की करत शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी ३१ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करत तीन जणांविरोधात वेगवेगळ्या कलमान्वये शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शनीपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इस्लामपूरा भागातील मदिना मशिदजवळ काही जण अवैधपणे गोमांस विक्री करत असल्याची गोपनिय माहिती शनीपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कावेर कमलाकर यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी स्वत: पथकासह सोमवारी ९ जून रोजी कारवाई केली. त्यावेळी नरगिस रऊफ खान वय २०, जमीलाबी अजिज शेख वय ७० दोन्ही रा. इस्लामपूरा, जळगाव यांनी आरडओरड करत पोलीसांना आरेरावी केली. त्यानंतर पोलीस निरीक्षक कावेर कमलाकर यांच्या अंगावर धावून हात उगारून धक्काबुक्की करत आणि शिवीगाळ केली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विक्की इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नरगिस रऊफ खान वय २०, जमीलाबी अजिज शेख वय ७० आणि मुस्तकीन शेख अजीज तीघे रा. इस्लामपूरा, जळगाव यांच्या विरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात अवैधरित्या गोमांस बाळगणे आणि सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मन्सुरी हे करीत आहे.