भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील नॉर्थ कॉलनी परिसरात झालेल्या कथित घरफोडीचा पर्दाफाश झाला आहे. सुरुवातीला घरफोडीचा गुन्हा म्हणून दाखल झालेल्या या प्रकरणात, पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीतून धक्कादायक सत्य समोर आले आहे. जुगाराच्या व्यसनापायी एका महिलेनेच घरातील सोन्या-चांदीचे दागिने गहाण ठेवून त्यातून मिळालेले पैसे जुगार आणि इतर खर्चासाठी वापरल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर तिने घरातील लोकांना आणि पोलिसांना घरफोडीचा बनाव सांगितल्याचे निष्पन्न झाले आहे.
काय घडले होते? आणि पोलिसांची शंका
१० जून रोजी दुपारी १२ ते १.३० वाजण्याच्या सुमारास नॉर्थ कॉलनीतील घरात घरफोडी झाल्याची तक्रार प्रितम पुरुषोत्तम बागुल (वय २६, रा. चिंचगव्हाण, ता. चाळीसगाव) यांनी दिली होती. त्यानुसार, भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी ११ जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी परिसराची पाहणी केली असता, घटनास्थळाशेजारील एक घर १० दिवसांपासून बंद असूनही तेथे कोणतीही चोरी झाल्याचे दिसून आले नाही. तसेच, फिर्यादीच्या घराचे कुलूप तुटलेले नसून ते व्यवस्थित असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यामुळे पोलिसांना घरफोडीच्या घटनेबाबत संशय आला आणि त्यांनी फिर्यादीच्या घरातील लोकांची सखोल चौकशी सुरू केली.
जुगाराचे व्यसन ठरले कारण, आईनेच केली फसवणूक
पोलिसांनी केलेल्या कसून चौकशीत फिर्यादी सतन चंद्रमनी शिंदे यांच्या आई शर्मीला चंद्रमनी शिंदे (वय ४९, रा.नॉर्थ कॉलनी एरिया भुसावळ) यांनी सत्य सांगितले. काही दिवसांपासून त्यांना जुगार खेळण्याची सवय जडली होती. त्यांनी घरातील रोख रक्कम आणि सावकाराकडून घेतलेले पैसे जुगारात गमावले होते. पुन्हा जुगार खेळून पैसे जिंकण्याच्या आमिषाने, त्यांनी कोणालाही न सांगता घरातील स्वतःचे आणि त्यांच्या आईचे सोन्या-चांदीचे दागिने बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक शाखा, भुसावळ येथे तारण ठेवले. यावर गोल्ड लोन घेऊन मिळालेले पैसे त्यांनी जुगारात, आईच्या आजारपणात आणि घरखर्चासाठी वापरल्याचे सांगितले. तसेच, काही रोख रक्कमही जुगारात वापरल्याची कबुली त्यांनी दिली. यानंतर, त्यांनी घरफोडी झाल्याचा बनाव रचून फिर्यादी सतन चंद्रमनी शिंदे यांना सांगितले. यामुळे सतन चंद्रमनी शिंदे यांनी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शर्मीला चंद्रमनी शिंदे यांनी बँकेत तारण ठेवलेल्या दागिन्यांच्या पावत्याही बँकेकडून प्राप्त केल्या आहेत.
पोलिसांची कामगिरी आणि आरोपी निष्पन्न
जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक (स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव) संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सहाय्यक फौजदार रवी नरवाडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल गोपाल गव्हाळे, संदीप चव्हाण आणि चालक पोलीस कॉन्स्टेबल महेश सोमवंशी (सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव) यांनी या गुन्ह्याचा यशस्वी तपास केला. त्यांच्या चौकस बुद्धीमुळे आणि तपास स्त्रोतांच्या योग्य वापरामुळे शर्मीला चंद्रमनी शिंदे या आरोपीला निष्पन्न करण्यात यश आले.