फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येत्या बकरी ईदनिमित्त फैजपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात भरणारा बकरी बाजार आता पाडळसा उपबाजार समितीमध्ये भरणार आहे. नागरिकांना होणारा त्रास आणि वाहतुकीची कोंडी लक्षात घेता, हा निर्णय घेतल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश फेगडे यांनी दिली आहे.
गेल्या बुधवारी (२८ मे) फैजपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भरलेल्या बकरी ईद बाजारादरम्यान मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. बाजार परिसरात चार ते पाच रुग्णालये असतानाही, बस स्थानकापासून ते राजबागपर्यंतचा संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. यामुळे रुग्णवाहिकांना (ॲम्बुलन्स) रुग्णालयात पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागली, तसेच वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. याच गर्दीत एक रुग्णवाहिका अडकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता.
गेल्या अनेक वर्षांपासून फैजपूर कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातच बकरी बाजार भरवला जात आहे. बकरी ईद असल्याने या बाजारात महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि मुंबई येथून मोठ्या संख्येने व्यापारी दाखल होतात, ज्यामुळे बाजारात प्रचंड गर्दी होते. या गर्दीमुळे बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्ग हा मधुकर सहकारी साखर कारखान्यापासून ते फैजपूर बसस्थानकापर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येत होता. यामुळे सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता, तसेच दुर्गंधीचाही सामना करावा लागत असे. रुग्णालये जवळ असल्याने रुग्णांना तातडीने वैद्यकीय सेवा मिळण्यात अडथळे येत होते.
नागरिकांच्या या संतप्त भावना आणि गैरसोय लक्षात घेऊन, कृषी उत्पन्न बाजार समिती यावलने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार, ४ जून रोजी फैजपूर येथे भरणारा बकरी बाजार आता पाडळसा उपबाजार येथे भरवण्यात येईल, असे सभापती राकेश फेगडे यांनी स्पष्ट केले आहे. या निर्णयामुळे नागरिकांची गैरसोय टळेल आणि वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.