पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील बोदर्डे येथील जिल्हा परिषद शाळेच्या स्वयंपाक घरावर बुधवारी (१२ जून) रात्री ९ वाजता अचानक आलेल्या वादळी पावसामुळे एक मोठे झाड कोसळले. यामुळे स्वयंपाकघर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून, यात सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
घटनेची माहिती मिळताच पाहणी
या घटनेची माहिती मिळताच शाळेच्या मुख्याध्यापक सुषमा पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी त्यांना स्वयंपाकघर आणि त्यातील सर्व वस्तू जमीनदोस्त झाल्याचे दिसले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन, सरपंच जितेंद्र पाटील आणि पोलीस पाटील समाधान पाटील यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनी तात्काळ तलाठी कार्यालयाला माहिती दिली.
पंचनामा सादर, दुरुस्तीची मागणी
घटनेची माहिती मिळताच तलाठी आशिष पारधी यांनी तातडीने स्थळनिरीक्षण करून पंचनामा केला आणि तसा अहवाल तहसील कार्यालयाला सादर केला आहे. शाळेचे स्वयंपाकघर पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन मिळण्यास अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे, शाळा सुरू होण्यापूर्वीच स्वयंपाकघरची दुरुस्ती करून ते पूर्ववत करावे, अशी मागणी मुख्याध्यापक, सरपंच, पोलीस पाटील आणि ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.