चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव तालुक्यातील कोंगानगर शिवारातील शेतात काम करत असताना अंगावर अचानक वीज कोसळल्याने तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची आणि एक जण गंभीर जखमी झाल्याची एक अत्यंत धक्कादायक घटना रविवारी १५ जून रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास सुमारास घडली आहे. मृतांमध्ये दोन अल्पपवयीन मुलांचा समावेश आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून, गावावर शोककळा पसरली आहे.
मृत आणि जखमी व्यक्तींची ओळख
या हृदयद्रावक दुर्घटनेत मरण पावलेल्यांमध्ये लखन दिलीप पवार (वय १४, रा. कोंगानगर), दशरथ उदल पवार (वय २४, रा. कोंगानगर) आणि समाधान प्रकाश राठोड (वय ९, रा. जेहूर, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) यांचा समावेश आहे. दुर्घटनेत दिलीप उदल पवार (वय ३५) हा तरूण गंभीर जखमी झाला असून त्यांना तात्काळ चाळीसगाव येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्रशासनाकडून तातडीची मदतकार्य सुरू
या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच चाळीसगावचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार महसूल, मंडळ अधिकारी आणि तलाठी यांनी तात्काळ शासकीय रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांना भेटून धीर दिला आणि त्यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. पुढील मदत कार्यासाठी महसूल प्रशासनाकडून आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिली.