बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बोदवड तालुक्यातील केसरी स्पोर्ट ॲकॅडमीच्या १३ क्रिकेट खेळाडूंच्या क्रुझर वाहनाला अहमदनगर-संभाजीनगर महामार्गावर नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला शिवारात आज, सोमवारी पहाटे सव्वा पाच वाजता भीषण अपघात झाला. पुण्याहून क्रिकेट सामना पाहून परत येत असताना हा अपघात झाला, ज्यात दोन खेळाडूंचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ११ जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अधिक माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथील केसरी स्पोर्ट अकॅडमीचे १३ खेळाडू पुण्यातील गहुंजे येथे एमपीएल क्रिकेट सामना पाहण्यासाठी गेले होते. सामना आटोपल्यानंतर ते क्रुझर वाहन क्रमांक (एमएच २० डीजे ४८३४) ने बोदवडकडे परतत होते. आज पहाटे ५ वाजून १५ मिनिटांनी उस्थळ दुमाला गावाच्या हद्दीत त्यांच्या क्रुझर वाहनाला मागून येणाऱ्या एका ट्रकने जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात प्रथमेश योगेश तेली (वय १४, रा. जामखी दरवाजा, बोदवड) याचा जागीच मृत्यू झाला, तर वृषभ बबन सोनवणे (वय १६, रा. बोदवड) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोबत असलेले अन्य ११ जखमी खेळाडू नेवासा फाटा येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यासह पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी रुग्णवाहिकेच्या साहाय्याने जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे बोदवड तालुक्यात शोककळा पसरली आहे. या घटनेबाबत नेवासा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ही घटना घडल्यानंतर बोदवड येथील नगरसेवक भरत आप्पा पाटील हे नेवासा येथील पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्याशी सातत्याने संपर्कात राहून वेळोवेळी अपडेट घेत होते. मृतक मुलांच्या आई वडील व नातेवाईकांना संपूर्ण माहिती दिली, त्यानंतर ही घटना घडल्यानंतर मयत झालेल्या मुलांचे नातेवाईकांनी अहिल्यादेवी नगर येथे रवाना झाले आहे. या घटनेमुळे बोदवड तालुक्यात हाडाळ व्यक्त केले जात आहे.