जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका ४६ वर्षीय व्यक्तीच्या वीज मीटर बदलाच्या कामासाठी १५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या कंत्राटी वायरमनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज मंगळवारी १० जून रोजी दुपारी ३ वाजता कारवाई करत ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या कारवाईने महावितरणमधील भ्रष्टाचाराचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रभात कॉलनी कक्षात कंत्राटी वायरमन म्हणून कार्यरत असलेल्या भूषण शालिग्राम चौधरी (वय ३७) याच्याविरुद्ध एका ४६ वर्षीय व्यक्तीने एसीबीकडे तक्रार दिली होती. तक्रारदाराच्या राहत्या घराचे वीज मीटर पूर्वीच्या मालकाच्या नावावर होते. महावितरणकडून वीज मीटर बदलण्याचे काम सुरू असताना, तीन दिवसांपूर्वी वायरमन भूषण चौधरी तक्रारदाराच्या घरी मीटर बदलण्यासाठी आला होता.
तेव्हा चौधरीने तक्रारदाराला सांगितले की, “तुमच्या वीज मीटरचे सील तुटलेले आहे आणि तुम्ही त्यात छेडछाड केली असल्याने तुम्हाला आर्थिक दंड होईल व वीज चोरीचा गुन्हा दाखल होईल.” हा गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि वीज मीटर टेस्टिंगचा रिपोर्ट ‘ओके’ देण्यासाठी भूषण चौधरीने तक्रारदाराकडे १५ हजार रुपयांची लाच मागितली होती.
तक्रारदाराने १० जून रोजी एसीबीकडे याबाबत तक्रार केल्यानंतर, एसीबीने पंचांसमक्ष या तक्रारीची पडताळणी केली. त्यावेळी आरोपी भूषण चौधरीने स्वतःसाठी आणि मीटर टेस्टिंग करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ५ हजार रुपयांची मागणी केली. दरम्यान एसीबीच्या पथकाने मंगळवारी १० जून रोजी दुपारी ३ वाजता सापळा रचून कारवाई केली. त्यावेळी भूषण चौधरीने पंचांसमक्ष तक्रारदाराकडून ५ हजार रुपये स्वीकारले असता, त्याला रंगेहात पकडण्यात आले.
एसीबीने लाचेची रक्कम ५ हजार रुपये हस्तगत केली आहे. आरोपी भूषण चौधरीला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यातगुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या कारवाईत पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर आणि पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.