जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शिव कॉलनी येथील राष्ट्रीय महामार्गावर एका महसूल कर्मचाऱ्याला ट्रकने धडक देवून चिरडल्याची घटना घडली होती. या संदर्भात सोमवारी २ जून रोजी रात्री ९ वाजता ट्रक वरील अज्ञात चालका विरोधात जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील शिव कॉलनी येथे राहणारे विशाल रमेश सोनार (वय-३५) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. धरणगाव येथील पाटबंधारे खात्यामध्ये शिपाई म्हणून कार्यरत होते. रविवार १ जून रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ते शिव कॉलनी येथील राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असताना धुळ्याकडून भुसावळकडे जाणारा एका ट्रक क्रमांक (आरजे ०४ जीबी ७८३१) ने त्यांना जोरदार धडक देऊन चिरडले. या अपघातात विशाल सोनार यांचा जागेवरच मृत्यू झाला होता. ही घटना घडल्यानंतर ट्रक चालक हा भुसावळकडे घेऊन पसार झाला होता. या घटने संदर्भात त्यांची पत्नी स्नेहा सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक वरील अज्ञात चालका विरोधात सोमवारी २ जून रोजी रात्री ९ वाजता जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्य पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण करीत आहे.