जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दीपनगर येथील वीज महानिर्मिती प्रकल्पाची राख अवैधरित्या चोरून वाहतूक करणाऱ्या दोन डंपरवर एमआयडीसी पोलिसांनी सोमवार, १६ जून रोजी रात्री १० वाजता शिरसोली रोडवर कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी दोन्ही डंपर जप्त केले आहेत.
एमआयडीसी पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील शिरसोली रोडवरील गुंजाळ मंगल कार्यालयाजवळ दीपनगर येथील वीज महानिर्मिती प्रकल्पाची राख अवैधरित्या चोरून वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने कारवाई करत डंपर क्रमांक एमएच ०१ सीवाय ९७२९ आणि एमएच ५२ ९०९९ या दोन डंपरवर कारवाई केली. यावेळी चालकांकडे वाहतुकीबाबत कोणतीही परवानगी आढळून आली नाही. मंगळवार, १७ जून रोजी सायंकाळी ५ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात महावितरण वीज निर्मिती कंपनीचे अमोल गीते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डंपर चालक शकील शब्बीर शेख (वय ४०, रा. चाळीसगाव) आणि सुनील हरी राठोड (वय ३५, रा. वढरे, ता. चाळीसगाव) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले करत आहेत.