यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येत्या ७ जून रोजी साजरा होणाऱ्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर यावल पोलीस स्टेशनच्या वतीने गुरुवारी ६ जून सायंकाळी पोलीस स्टेशन आवारात शांतता समितीच्या सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. नवनियुक्त पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत बकरी ईद शांततेत पार पाडण्याचे आवाहन सर्व समाज बांधवांना करण्यात आले.
या बैठकीत शांतता समितीचे ज्येष्ठ सदस्य हाजी शब्बीर खान, भगतसिंग पाटील, पुंडलिक बारी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनीही नागरिकांना कोणत्याही सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास न ठेवता, पारंपरिक पद्धतीने आणि शांततेत ईद साजरी करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी शेख अलीम, ज्येष्ठ सदस्य विजय सराफ, संतोष खर्चे, अशपाक शाह, चेतन आढळकर, भूषण फेगडे, मुकेश कोळी, पराग सराफ, करीम मणियार, नईम शेख, सय्यद युनूस, सय्यद युसुफ, समीर खान, तसलीम खान, सलीम शेख फारुख, शेख मोहम्मद शफी, शेख हबीब मंजर यांच्यासह शहरातील शांतता समितीचे अनेक सदस्य उपस्थित होते. या बैठकीमुळे समाजात सलोखा आणि शांतता राखण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.