मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मध्य रेल्वेवरील मुंब्रा स्थानकाजवळ आज (दि.९ जून) रोजी सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कसाऱ्याकडे जाणाऱ्या फास्ट लोकलमधून पडून सहा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे रेल्वे रुळावर रक्त आणि मृतदेह पसरल्याने हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाला उपरती आली असून, मोठा निर्णय घेतला आहे.
याबाबत मध्ये रेल्वेचे सीपीआरओ स्वप्नील नीला म्हणाले की, “रेल्वे बोर्डाने असा निर्णय घेतला आहे की, मुंबई उपनगरीय रेल्वेअंतर्गत तयार होणाऱ्या प्रत्येक कोचमध्ये ऑटोमॅटिक दरवाजे बसवले जातील. याशिवाय सध्या वापरात असलेल्या मुंबई उपनगरीय लोकलच्या डब्यांचे पुनर्रचना (रीडिझाईनिंग) करण्यात येणार असून, त्यामध्ये देखील ऑटोमॅटिक दरवाजे बंद होण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल”, असे त्यांनी म्हटले. तसेच सुरुवातीला हे प्रवाशी पुष्पक एक्स्प्रेसमधून पडल्याची माहिती समोर आली होती. मात्र, या अपघाताशी पुष्पक एक्स्प्रेसचा कुठलाही संबंध नाही, असेही नीला यांनी स्पष्ट केले.
तसेच “सीएसएमटी ट्रॅक आणि कसारा ट्रॅकवरून दोन लोकल या ट्रॅकवर एकमेकांना क्रॉस करत होत्या. यावेळी दोन लोकल आजूबाजूला येताच प्रवासी एकमेकांना धडकले आणि ट्रॅकवर पडले.प्रवासी ट्रॅकवर पडल्यानंतर स्थानिक लोकांनी त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी प्रयत्न केले. यानंतर रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या जखमींवर कळवा येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे”, असेही स्वप्नील नीला म्हणाले.
तिसऱ्या आणि चौथ्या लाईनचा प्लान
मध्ये रेल्वेने कल्याणपासून कसारापर्यंत आणि कल्याणपासून कर्जतपर्यंत तिसऱ्या आणि चौथ्या लाइनचा विचार केला आहे. दादर, दिवापासून सीएसटीपर्यंत पाचव्या आणि सहाव्या लाइनचे प्लॅनिंग केले आहे. ही लाइन कुर्लापर्यंत झाली असून पुढच्या कामासाठी जागा घेतली जात आहे. सीएसटीवरील सिग्लनची सिस्टिम अपग्रेड केली आहे. लोकलच्या २२ फेऱ्या चालतात त्या वाढवल्या जातील, अशी माहिती स्वप्नील नीला यांनी दिली.