जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील प्रमुख आणि नेहमीच गजबजलेल्या गोलानी मार्केटमध्ये सोमवारी दुपारी एका किरकोळ कारणावरून ग्राहक आणि दुकानदारांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेने क्षणातच तणावाचं वातावरण निर्माण झालं. घटनेची माहिती मिळताच काही चुकीच्या अफवा पसरल्या आणि त्यामुळे अवघ्या पाच मिनिटांत संपूर्ण मार्केटने दुकानांचे शटर खाली ओढत व्यवहार बंद केले.
अचानक निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे बाजारात गोंधळ आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं. घटनेची माहिती मिळताच जळगाव शहर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्वरेने परिस्थितीचा आढावा घेत दोन्ही पक्षांना ताब्यात घेतले आणि नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले.
पोलीस हस्तक्षेपामुळे तणाव काहीसा निवळला असून, पोलिसांनी केलेल्या सूचनेनंतर काही वेळातच गोलाणी मार्केट पुन्हा सुरू करण्यात आला. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून, पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे.