जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केंद्रीयमंत्री रक्षा खडसे यांनी नुकतीच रेल्वे बोर्डाचे चेअरमन सतीश कुमार यांची भेट घेऊन भुसावळ रेल्वे विभागातील रावेर आणि बोदवड स्थानकांवर काही महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांना थांबे देण्याची मागणी केली आहे. या बैठकीत रावेर आणि वरणगाव स्थानकांवर स्थानिक नागरिकांच्या वाढत्या मागणीनुसार गाड्यांचे थांबे देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी प्रवाशांच्या सोयीसाठी काही महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांचे थांबे तात्काळ मंजूर करण्याची विनंती केली. यामध्ये प्रमुख गाड्यांचा समावेश आहे: नवजीवन एक्स्प्रेस (गाडी क्र. १२६५६) ला बोदवड येथे थांबा, तर दानापूर पुणे एक्सप्रेस (गाडी क्र. १२१५०) (पुणे मार्गावर) आणि महानगरी एक्सप्रेस (गाडी क्र. २२१७७) या दोन्ही गाड्यांना रावेर येथे थांबा देण्याची मागणी करण्यात आली.
या गाड्यांना रावेर येथे थांबे देण्यात आल्यास शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी, नोकरदार, कामगार वर्ग तसेच सामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, असे श्रीमती खडसे यांनी नमूद केले. यामुळे संपूर्ण परिसराचा सामाजिक व आर्थिक विकास साधला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
रेल्वे बोर्डाचे चेअरमन सतीश कुमार यांनी या मागण्यांकडे सकारात्मकपणे लक्ष देण्याचे आश्वासन दिले असून, लवकरच यावर निर्णय घेण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या बैठकीला रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. या मागण्या मान्य झाल्यास रावेर आणि परिसरातील हजारो प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.