यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल शहराला लागून वाहणाऱ्या हडकाई-खडकाई नदीच्या पात्रातून जाणाऱ्या जुन्या कोरपावली रस्त्यावर पूल बांधण्यात यावा, अशी मागणी यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश फेगडे यांनी केली आहे. शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा मार्ग कोरपावली ते यावल शहर कमी वेळेत जोडतो. यामुळे शेतकऱ्यांचा प्रवास सुकर होईल, असे फेगडे यांनी म्हटले आहे.
यावल ते कोरपावली हा जुना मार्ग अवघ्या पाच ते सहा किलोमीटर लांबीचा आहे. या रस्त्याच्या डांबरीकरणाला लोकप्रतिनिधींनी मंजुरी दिली असून, लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती सभापती राकेश फेगडे यांनी दिली. मात्र, याच मार्गावर असलेल्या हडकाई नदीच्या पात्रात पूल नसल्याने शेतकऱ्यांसह अनेक ग्रामस्थांना अडचणींचा सामना करावा लागतो.
या नदीपात्रात पूल बांधल्यास हरिपुरा, मोहराळा, महेलखेडी आणि दहिगाव-कोरपावली येथील ग्रामस्थांना यावल शहरात ये-जा करण्यासाठी कमी वेळेत एक चांगला पर्याय उपलब्ध होईल. यामुळे शेतकऱ्यांच्या अनेक समस्या मार्गी लागतील, अशी मागणी फेगडे यांनी केली आहे.
या संदर्भात आपण रावेर-यावलचे आमदार अमोल जावळे आणि चोपड्याचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे या दोघांशीही संपर्क साधला असून, नदीपात्रात पूल बांधण्याबाबत आपण आग्रही असल्याचे राकेश फेगडे यांनी सांगितले. यामुळे शेतकऱ्यांच्या सोयीसोबतच परिसरातील गावांच्या विकासालाही गती मिळेल अशी अपेक्षा आहे.