धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील खर्दे बुद्रुक येथील भिल्ल समाजाची अनेक वर्षांपासूनची दफनभूमी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. गावातीलच एका व्यक्तीने जेसीबी लावून दफन झालेल्या मृतदेहांची अवहेलना करण्याचा धक्कादायक प्रकार सुरू केल्याचा आरोप एकलव्य संघटनेने केला आहे. या गंभीर प्रकरणी एकलव्य संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापू मोरे यांनी धरणगाव तहसीलदारांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, खर्दे बुद्रुक ग्रामपंचायतीने भिल्ल समाजाला दफनभूमीसाठी जागा दिली असून, अनेक वर्षांपासून त्याच ठिकाणी दफनविधी केले जात आहेत. मात्र, गावातील एका व्यक्तीने या दफनभूमीत जेसीबी घेऊन मृत शरीरांची अवहेलना सुरू केली आहे, ज्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या जात आहेत.
सदर व्यक्तीला समजावून सांगायला गेले असता, तो “तुम्ही माझे काही करू शकत नाही. माझी शेती धरणात गेलेली आहे आणि मला त्यातून भरमसाठ पैसा मिळालेला आहे. तुम्ही येथून निघून जा, तुमची घरे देखील माझ्या हद्दीत आहेत. पोलीस निरीक्षक हे पण माझे नातेवाईक आहेत, माझी साधी तक्रार पण होऊ शकत नाही,” अशाप्रकारे संपूर्ण समाजाला धमकी देत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. जर समाजातील कोणत्याही व्यक्तीला काही बरेवाईट झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित व्यक्ती आणि त्याचे नातेवाईक यांची राहील, असेही निवेदनात स्पष्ट केले आहे.
एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य यांनी म्हटले आहे की, भिल्ल समाजाची दफनभूमी ही त्यांची स्वतःची आहे आणि ती त्यांना परत मिळाली नाही, तर एकलव्य संघटना संपूर्ण जिल्ह्यात आंदोलने छेडेल. यातून काही अनुचित प्रकार घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी शासन-प्रशासनाची राहील, याची नोंद घ्यावी असा इशाराही देण्यात आला आहे.
या गंभीर प्रकरणाची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन दोषी व्यक्तीवर कठोर कारवाई करावी आणि भिल्ल समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.