जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील वावडे शिवारात शेतातील सामाईक विहिरीतून पाणी भरण्यावरून झालेल्या वादामुळे एका तरुणाला त्याच्या काका, काकू आणि इतर कुटुंबीयांकडून बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी, ७ जून रोजी सकाळी १० वाजता घडलेल्या या घटनेप्रकरणी सोमवारी, ९ जून रोजी दुपारी २.३० वाजता मारवड पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र भीमराव वानखेडे (वय ३०, रा. वावडे, ता. अमळनेर) हा तरुण आपल्या कुटुंबासोबत वास्तवाला असून, शेती करून आपला उदरनिर्वाह करतो. वावडे शिवारातील गट नंबर ४२२ मध्ये असलेल्या त्यांच्या शेतात त्याची आणि त्याच्या काकांची सामाईक विहीर आहे. या विहिरीतून आळीपाळीने पाणी भरले जाते. याच क्रमात, शनिवारी, ७ जून रोजी सकाळी १० वाजता नरेंद्र वानखेडे शेतात पाणी भरण्यासाठी गेला होता. त्यावेळी शेतात काम करत असलेले त्याचे काका शिवाजी विठ्ठल पाटील यांनी विहिरीतील मोटारीचा फ्यूज काढून घेतला. नरेंद्रने याबाबत जाब विचारला असता, त्याचा राग आल्याने काका शिवाजी पाटील यांच्यासह काकू सुलाबाई शिवाजी पाटील, दुसरे काका गुलाब विठ्ठल पाटील, चुलत भाऊ ज्ञानेश्वर गुलाब पाटील, त्याची पत्नी आशाबाई पाटील आणि पुतण्या प्रतीक ज्ञानेश्वर पाटील यांनी नरेंद्रला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर, त्यांनी लाकडी काठी आणि लोखंडी रॉडने नरेंद्रला बेदम मारहाण करत गंभीर दुखापत केली.
या मारहाणीत नरेंद्र गंभीर जखमी झाला. आजूबाजूच्या शेतातील शेतकऱ्यांनी धाव घेऊन भांडण सोडवले आणि जखमी नरेंद्रला तातडीने अमळनेर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान नरेंद्र वानखेडे यांनी दिलेल्या जबाबावरून मारवड पोलीस ठाण्यात मारहाण करणाऱ्या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश पाटील करत आहेत. या घटनेने वावडे परिसरात खळबळ उडाली असून, सामाईक विहिरीच्या पाण्यावरून इतका टोकाचा वाद झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.