अडावद-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नवीन शैक्षणिक वर्षाच्या उत्साहात अडावद येथील जिल्हा परिषद शाळेने आपला प्रवेशोत्सव साजरा केला. या कार्यक्रमात आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी विशेष उपस्थिती लावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ग्रामीण भागातील शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी त्यांचा हा उपक्रम कौतुकास्पद ठरला. यावेळी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना दप्तर, शैक्षणिक साहित्य, बूट-सॉक्स, गणवेश पहिल्याच दिवशी मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
आमदारांनी सांगितला शाळेतील पहिला दिवस
या शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी भूषवले. त्यांनी यावेळी उपस्थितांसोबत आपल्या शाळेच्या पहिल्या दिवसाचा अनुभव शेअर केला. “माझे शिक्षणही जिल्हा परिषदेच्या शाळेतून झाले आहे,” असे सांगत त्यांनी आपल्या प्रवेशाच्या आठवणींना उजाळा दिला आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला. चोपडा पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकारी कविता सुर्वे यांचीही यावेळी विशेष उपस्थिती होती. आमदारांच्या या मनमोकळ्या संवादामुळे विद्यार्थी आणि पालकांना प्रेरणा मिळाली.
दप्तर वाटप, सेल्फी आणि आठवणींचा संगम
राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शैक्षणिक वर्षाची सुरुवात ‘शाळा प्रवेशोत्सव’ म्हणून उत्साहात साजरी केली जात आहे. अडावद येथे मुलांची व मुलींची शाळा अशा दोन्ही शाळांचा संयुक्त कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. पहिलीच्या सर्व विद्यार्थ्यांना दोन-चारचाकी गाड्यांमधून शाळेत आणले गेले आणि त्यांचे स्वागत लेझिम पथकाने केले. आमदारांनी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले, त्यांच्यासोबत सेल्फी काढल्या, तसेच पाठ्यपुस्तके आणि दप्तरांचे वाटपही केले. एका विद्यार्थिनीच्या पावलांना ओल्या कुंकवात रंगवून कोऱ्या कागदावर उमटवून हा प्रवेश सोहळा अधिक आनंदमय करण्यात आला. सीबीएससी पॅटर्न सुरू झाल्याने एक सुंदर सेल्फी पॉईंट बनवण्यात आला होता, ज्याचे अनावरणही आमदारांच्या हस्ते झाले.
ग्रामीण शिक्षणाचे महत्त्व आणि आव्हाने
यावेळी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी आपल्या शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा देत ग्रामीण शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. सध्याच्या टीव्ही आणि मोबाइलच्या युगात ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्याचे आव्हान शिक्षण क्षेत्राला स्वीकारावे आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक वृद्धी करावी, असा सल्ला त्यांनी दिला. त्यांनी पालकांच्या बदललेल्या दृष्टिकोनावरही भाष्य केले, “पूर्वी एका घरात पाच ते सात बालके असायची.
तेव्हा पालक गुरुजींना येऊन मुलाला कडक शिक्षा करायला लावायचे, परंतु आताचे पालक शिक्षकांना माझ्या मुलाला मारणे तर दूरच, रागवायचे देखील नाही अशी तंबीच देतात. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना मूल्याधिष्ठित शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करावा.” यावेळी पहिलीच्या मुलींना दप्तर, शैक्षणिक साहित्य, बूट-सॉक्स, गणवेश पहिल्याच दिवशी मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. सर्व मुलींना स्कूल बॅग ग्रामविकास अधिकारी प्रमोद सैंदाणे यांच्याकडून देण्यात आल्या.
गटशिक्षणाधिकारींचे आवाहन आणि मान्यवरांची उपस्थिती
चोपडा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिक्षण घेण्याचे आवाहन केले. “सर्व तालुक्यातील पहिली व दुसरीच्या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांचे सीबीएससी बोर्डाच्या अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण शाळा सुरू होण्याअगोदरच झाले आहे. म्हणून पालकांनी जास्तीतजास्त मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घ्यावा,” असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी सरपंच बबनखा तडवी, उपसरपंच विजिता पाटील, वडगाव बु. चे माजी सरपंच नामदेव पाटील, विकासो संचालक लोकेश काबरा, सचिन महाजन, प्रकाश महाजन, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख जीवन माळी, मुख्याध्यापक श्रीराम पाटील, राजेश अडवाल, पत्रकार, ग्रामस्थ, पालक वर्ग आणि शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.