जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कान, नाक, घसा विभागाच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. जान्हवी बनकर यांना ‘सर्वोत्कृष्ट विश्लेषक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या यशामुळे वैद्यकीय क्षेत्रात जळगावचे नाव उंचावले आहे.
सूक्ष्म कान शस्त्रक्रिया कार्यशाळेतील सहभाग
डॉ. मोरवाणी ईएनटी आणि लॅटरल स्कल बेस ग्रुप यांच्या वतीने, एमजीएम मेडिकल कॉलेज, कामोठे, नवी मुंबई येथे १३ ते १५ जून २०२५ दरम्यान सूक्ष्म कान शस्त्रक्रियेसाठी टेम्पोरल बोन डिसेक्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या महत्त्वपूर्ण शैक्षणिक कार्यशाळेत डॉ. जान्हवी बनकर यांनी प्रतिनिधी म्हणून सहभाग घेतला. या कार्यशाळेचे आयोजन ईएनटी आणि अॅनाटॉमी विभागाच्या सहकार्याने करण्यात आले होते.
मार्गदर्शन आणि अभिनंदनाचा वर्षाव
या उत्कृष्ट उपक्रमातील योगदानासाठी डॉ. जान्हवी बनकर यांना ‘सर्वोत्कृष्ट विश्लेषक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना विभाग प्रमुख डॉ. अनुश्री अग्रवाल, डॉ. श्रुती पाटील आणि डॉ. पंकजा बेंडाळे यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. जान्हवी बनकर यांच्या यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकीताई, डॉ. वैभव, डॉ. अनिकेत, डॉ. अक्षता पाटील यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन. एस. आर्विकर आणि अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके यांनी अभिनंदन केले आहे.