जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील एकलव्य क्रीडा संकुलाच्या एकलव्य रायफल व पिस्तूल शूटिंग अकॅडमीच्या खेळाडूंनी अमरावती येथे नुकत्याच पार पडलेल्या इंटर बटालियन शूटिंग स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या खेळाडूंनी दमदार प्रदर्शन करत स्पर्धेवर आपली छाप सोडली.
या स्पर्धेतील ५० मीटर थ्री पी रायफल प्रकारात एकलव्य अकादमीच्या पाच खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. यामध्ये तुषार जाधव आणि आर्या भालेराव यांनी नेत्रदीपक कौशल्य दाखवत सुवर्णपदकांवर आपले नाव कोरले. तर मोहिनी सपकाळे आणि यश सोनवणे यांनीही प्रभावी कामगिरी करत कांस्यपदके पटकावली, ज्यामुळे त्यांच्या कलेची छाप उमटली.
याशिवाय, दीपेश तायडे आणि वैष्णवी सपकाळे यांनीही उल्लेखनीय प्रदर्शन केले. त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांनी कोल्हापूर येथे ऑगस्ट २०२५ मध्ये होणाऱ्या जी. व्ही. मालवणकर ऑल इंडिया शूटिंग चॅम्पियनशिप (राष्ट्रीय स्पर्धा) या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे.
या सर्व खेळाडूंना एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एकलव्य रायफल व पिस्तूल शूटिंग अकादमीचे प्रशिक्षक श्री. सागर सोनवणे यांनी कसून प्रशिक्षण दिले होते. खेळाडूंच्या या यशाबद्दल के.सी.ई. सोसायटीचे अध्यक्ष श्री. नंदकुमार बेंडाळे, कोषाध्यक्ष श्री. डी. टी. पाटील तसेच एकलव्य क्रीडा संकुलाचे प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांनी अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.