धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील हिंगोणे शिवारातील रस्त्यावर भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिल्याने शेतातून पायी जाणाऱ्या एका शेतमजूर गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर एरंडोल येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू असतांना मृत्यू झाला. याप्रकरणी गुरूवारी ५ मे रोजी दुपारी १ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, धनराज एकनाथ पाटील वय ४४ रा. हिंगोणे ता.धरणगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २९ मे रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास धनराज पाटील हे घरी पायी जाण्यासाठी हिंगोणे शिवारातील रस्त्याने जात असतांना मागून भरधाव वेगाने येणारे ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९ इपी ०१०७) ने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात धनराज पाटील हे गंभीररित्या जखमी झाले. त्याना एरंडोल येथील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुरूवारी ५ मे रोजी दुपारी १ वाजता गुरूदास एकनाथ पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक रविंद्र दगा पाटील वय ४२ रा. हिंगोणे ता.धरणगाव याच्यावर धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रमोद पाटील हे करीत आहे.