मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । राज्यात मोसमी पाऊस १५ जूननंतरच पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई करू नये, असे महत्त्वपूर्ण आवाहन राज्याच्या कृषी विभागाने केले आहे. दरम्यान, पुढील काही दिवसांत राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली असून, शेतकरी आणि मच्छिमार बांधवांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत पीक-पाण्याचा आढावा
ज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या पाऊस, पीक-पाणी, तसेच धरणांमधील पाणीसाठा या महत्त्वाच्या विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी यांनी सादरीकरणाद्वारे राज्यातील सद्यस्थितीची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, राज्याच्या सर्व भागांत १५ जूननंतरच मोसमी पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यातील १७ जिल्ह्यांत २५ टक्के पेक्षा कमी, १२ जिल्ह्यांत २५ ते ५० टक्के, चार जिल्ह्यांत ५० ते ७५ टक्के, तर केवळ एका जिल्ह्यांत १०० टक्के हून अधिक पाऊस झाला आहे. राज्यातील विविध विभागांत खते आणि बियाण्यांचा पुरवठा सुरळीत असून, अनेक ठिकाणी खतांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.
पुढील तीन-चार दिवसांत मान्सून पुन्हा सक्रिय
वेधशाळेच्या संचालक शुभांगी भुते यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली की, मोसमी पाऊस येत्या तीन ते चार दिवसांत पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. दक्षिण द्वीपकल्पीय भारताच्या भूभागातील कर्नाटकात १२ ते १५ जून दरम्यान, तर कोकण आणि गोवा येथे १३ ते १५ जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, मध्य महाराष्ट्रात १२ ते १५ जून, तर मराठवाड्यातील काही भागांत १२ ते १४ जून दरम्यान पावसाचा अंदाज आहे. कोकण आणि गोव्यामध्ये १३ व १४ जून रोजी अति मुसळधार पावसाची शक्यता असल्याने, या कालावधीत मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
वीज कोसळण्याच्या शक्यतेमुळे खुल्या मैदानावर काम करणे, झाडांखाली आसरा घेणे टाळावे, तसेच विजेची उपकरणे बंद ठेवावीत आणि पाण्याच्या स्रोतांपासून दूर राहावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.
धरणातील पाणीसाठा समाधानकारक
मंत्रिमंडळ बैठकीत जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सर्व प्रमुख धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा चांगला आहे. गोसीखुर्द, तोतलाडोह, जायकवाडी, कोयना, भातसा यांसारख्या प्रमुख धरणांमध्ये सध्याचा पाणीसाठा समाधानकारक स्थितीत आहे.