शेगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीच्या मागणीसाठी आणि ज्या शेतकऱ्यांना अद्याप पीक विमा मिळालेला नाही, त्यांना तो त्वरित मिळावा या प्रमुख मागण्यांसह शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मंगळवारी १० जून रोजी संतनगरी शेगाव येथे शेतकऱ्यांचा भव्य एल्गार पुकारला. संत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन तुपकरांनी या आंदोलनाची सुरुवात केली. क्रांतिकारी शेतकरी संघटनेने जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन केले होते आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र होते.
राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर राज्यभर एल्गार यात्रा काढत आहेत. विविध जिल्ह्यांमध्ये मेळावे घेऊन शेतकऱ्यांना एकत्र करून सरकारवर दबाव आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. संपूर्ण कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या हक्काचा पीक विमा तातडीने खात्यात जमा करणे, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई त्वरित मिळणे, सक्तीची कर्जवसुली थांबवणे, जंगली जनावरांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना करणे, तसेच सोयाबीनला ८ ते १० हजार रुपये आणि कापसाला १२ ते १४ हजार रुपये भाव मिळावा, यासह अनेक मागण्यांसाठी तुपकर यांनी राज्यव्यापी दौरे केले आहेत.
नाशिक, निफाड, सिन्नर, संगमनेर, अहमदनगर, शिक्रापूर, शिरूर, कर्जत, जामखेड, पंढरपूर, कोल्हापूर, सांगली, धाराशिव, नांदेड, परभणी, लातूर, बीड यासह अनेक जिल्ह्यांमध्ये दौरे करून तुपकरांनी शेतकऱ्यांमध्ये जागृती केली. २७ मे रोजी सिंदखेड राजा येथे झालेल्या एल्गार मेळाव्यात त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली होती. आज १० जून रोजी शेगाव येथील अग्रसेन चौकातील माहेश्वरी भवन येथे सकाळी ११ वाजता ही महत्त्वपूर्ण सभा पार पडली. संपूर्ण कर्जमुक्तीसाठी आणि पीक विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या पावत्या घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेने केले होते. यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता आहे.