भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतकऱ्यांना शेतीविषयक अद्ययावत माहिती मिळावी आणि कृषी विभागाच्या विविध योजनांची सखोल माहिती व्हावी या उद्देशाने भडगाव येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात शेतकरी वाचन कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव कुर्बान तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
कृषी सहाय्यक सुखदेव गिरी यांच्या विशेष पुढाकाराने सुरू झालेल्या या वाचन कक्षाचे उद्घाटन कृषी उपसंचालक भरत इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृषी विज्ञान केंद्र, ममुराबाद येथील विशेषतज्ञ किरण मांडोळे, इंजिनिअर वैभव सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी दिगंबर तांबे आणि मंडळ कृषी अधिकारी प्रताप खाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
भडगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयात विविध कामांसाठी आणि योजनांच्या माहितीसाठी शेतकरी नेहमीच येत असतात. अनेकदा काही कारणांमुळे त्यांना कार्यालयात थांबावे लागते. या वेळेचा सदुपयोग करून शेतकऱ्यांना शेतीविषयक ज्ञान मिळावे, यासाठी कृषी सहाय्यक सुखदेव गिरी यांनी वाचन कक्ष सुरू करण्याची संकल्पना मांडली. तालुका कृषी अधिकारी दिगंबर तांबे आणि मंडळ कृषी अधिकारी प्रताप खाडे यांनी तात्काळ याला होकार दिला.
या वाचन कक्षामध्ये शेतीविषयक विविध मासिके, शेतकरी मासिक, कृषी विद्यापीठाची दैनंदिनी, आणि विविध वृत्तपत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. कार्यालयीन कर्मचारी राजू लांडगे आणि विनोद पाटील यांच्या सहकार्याने हा वाचन कक्ष शेतकऱ्यांसाठी आता खुला झाला आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना माहितीच्या दृष्टीने अधिक सक्षम होण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.