जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी नगरातील उमर कॉलनी भागात वीजपुरवठा खंडित झाल्याने तो दुरुस्त करण्यासाठी गेलेल्या महावितरण कंपनीच्या दोन वरिष्ठ तंत्रज्ञ कर्मचाऱ्यांवर शनिवारी, १४ जून रोजी रात्री ११:३० वाजता जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात रविवारी, १५ जून रोजी सकाळी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी नगर हुडको भागातील महावितरण कार्यालयात तंत्रज्ञ सुदर्शन तुकाराम सपकाळे आणि त्यांचे सहकारी वरिष्ठ तंत्रज्ञ दीपक नंदलाल बडगुजर शनिवारी कामावर होते. रात्री साडेअकराच्या सुमारास शिवाजी नगर परिसरातील उमर कॉलनीतील केजीएन नमकीन जवळील भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी सुदर्शन सपकाळे आणि दीपक बडगुजर घटनास्थळी पोहोचले.
यावेळी, तिथे उपस्थित असलेल्या चार अनोळखी महिलांनी या दोन्ही कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात दीपक बडगुजर यांना एका महिलेच्या बांगडीचा काच लागल्याने त्यांच्या चेहऱ्याला दुखापत झाली आहे. या घटनेनंतर महावितरण कंपनीच्या वरिष्ठ तंत्रज्ञ संघटनेच्या वतीने शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. सुदर्शन सपकाळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून चार अनोळखी महिलांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संघटनेने या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
महावितरण कर्मचाऱ्यांकडून रात्री-अपरात्री, उन्हाळा, पावसाळा किंवा हिवाळा या कोणत्याही ऋतूची पर्वा न करता ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी अहोरात्र काम केले जाते. अनेकदा तांत्रिक अडचणींमुळे किंवा वाजवीपेक्षा जास्त वीज वापरल्यामुळे वीजपुरवठा खंडित होतो आणि तो दुरुस्त करण्यासाठी वेळ लागतो. अशा वेळी नागरिकांनी महावितरणच्या तंत्रज्ञांच्या समस्या समजून घेऊन त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन संघटनेने केले आहे. यावेळी तक्रार देण्यासाठी तंत्रज्ञ सुदर्शन सपकाळे, वरिष्ठ तंत्रज्ञ दीपक सपकाळे, वरिष्ठ तंत्रज्ञ दिनेश सपकाळे, वरिष्ठ तंत्रज्ञ वंदना वानखेडे यांच्यासह अन्य सहकारी उपस्थित होते.