जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतीमध्ये डाळिंब पीक हे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे उत्पन्न स्रोत ठरले आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या पिकावर कीटक आणि फळमाशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत होते. याच नुकसानीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत डाळिंब पिकासाठी ‘अॅन्टी हेलनेट कव्हर’ तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येणार आहे.
या योजनेचा लाभ नाशिक, धुळे आणि जळगाव या प्रमुख डाळिंब उत्पादक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतकऱ्यांना हे तंत्रज्ञान वापरासाठी अनुदानावर उपलब्ध करून दिले जाईल. या योजनेसाठी २० गुंठे ते १ एकर अशी क्षेत्र मर्यादा निश्चित करण्यात आली असून, प्रत्येक लाभार्थ्याला या मर्यादेत अनुदान देय राहील.
या तंत्रज्ञानाच्या वापरासाठी प्रती एकर ४,२४,६४० रुपये इतका खर्च अपेक्षित आहे, यापैकी शेतकऱ्यांना ५० टक्के म्हणजेच २,१२,३२० रुपये प्रती एकर इतके अनुदान मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक भार लक्षणीयरीत्या कमी होईल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे काही आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे. यामध्ये अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी, ७/१२ (डाळिंब पिकाच्या नोंदीसह), ८-अ, आधार कार्डाची छायांकित प्रत, आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत, जात प्रमाणपत्र (अनुसूचित जाती/जमाती शेतकऱ्यांसाठी), विहित नमुन्यातील हमीपत्र, बंधपत्र आणि चतुःसीमा नकाशा यांचा समावेश आहे.
या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin या संकेतस्थळाला भेट द्यावी. अधिक माहितीसाठी कृषी विभागाच्या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. सर्व प्रवर्गातील शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर जास्तीत जास्त अर्ज करून या घटकाचा लाभ घ्यावा, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर यांनी केले आहे. या योजनेमुळे डाळिंब उत्पादकांना मोठा दिलासा मिळेल आणि त्यांचे उत्पादन वाढण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.