जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव विमानतळावर एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) आणि गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत वैद्यकीय सुविधा केंद्राचे थाटात उद्घाटन करण्यात आले. या केंद्रामुळे विमानतळावरील प्रवासी तसेच येथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ आणि मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहे.
या प्रसंगी जळगाव विमानतळाचे संचालक हर्ष त्रिपाठी, गोदावरी फाऊंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील, डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे डायरेक्टर डॉ. एन. एस. आर्वीकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रेमचंद पंडित, डॉ. सुभाष बडगुजर, प्रशासकीय अधिकारी अशोक भिडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी देवतेचे पूजन करून श्रीफळ फोडून करण्यात आली. त्यानंतर फीत कापून या आपत्कालीन आरोग्य केंद्राचे औपचारिक उद्घाटन झाले. उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना विमानतळ संचालक हर्ष त्रिपाठी यांनी सांगितले की, “अत्यावश्यक सेवांची कधी आवश्यकता भासेल हे सांगता येत नाही, त्यामुळे जळगाव विमानतळावर अशी सुविधा उपलब्ध असावी यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील होतो. आज येथे आरोग्य सेवा सुरू झाल्याने आम्हाला प्रवाशांना ती तात्काळ उपलब्ध करून देता येणार आहे, याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे.”
त्यानंतर डॉ. केतकी पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “येथे प्रवाशांसह संपूर्ण कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य सुविधा सुरू करण्यात आली आहे. या केंद्रात डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ तसेच अत्यावश्यक औषधसाठा २४ तास उपलब्ध असणार आहे. तरी प्रवाशांनी तसेच कर्मचाऱ्यांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच या आरोग्य केंद्राचा लाभ घ्यावा,” असे आवाहन डॉ. केतकी पाटील यांनी केले. या प्रसंगी विमानतळावरील संपूर्ण स्टाफ उपस्थित होता. या केंद्रामुळे जळगाव विमानतळावरील आरोग्य सुविधांमध्ये मोठी भर पडली असून, प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेची हमी मिळाली आहे.