जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील हरीविठ्ठल नगरात ३० ते ३५ वर्षांपासून राहत असलेल्या एका आदिवासी भिल्ल कुटुंबाला त्यांच्याच घरातून बेघर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. विनोद पंढरीनाथ पाटील नावाच्या व्यक्तीने त्यांच्या जागेवर अनधिकृत बांधकाम करून ताबा मिळवला असून, जागा खाली करण्यासाठी तब्बल २ लाख रुपयांची मागणी करत असून, पैसे न दिल्यास जागा मिळणार नाही अशी धमकी देत असल्याचे पीडित वामन भाऊसिंग गायकवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला बुधवारी ४ जुन रोजी दुपारी १ वाजता दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा गायकवाड कुटुंबाने दिला आहे.
गायकवाड यांनी निवेदनात म्हटले आहे की, ते राहत असलेल्या जागेची घरपट्टी नियमितपणे भरत आहेत. तसेच, मनपाचे नळ कनेक्शन आणि वीज कनेक्शनही त्यांच्याच नावावर आहे. ते आणि त्यांची पत्नी वयोवृद्ध असल्याने त्यांची भाची लक्ष्मी भगवान मोरे त्यांची काळजी घेत आहे. असे असतानाही, गेल्या काही वर्षांपासून विनोद पंढरीनाथ पाटील आणि त्याचे कुटुंब यांनी त्यांच्या राहत्या जागेवर जोरजबरदस्तीने पक्के बांधकाम करून ताबा मिळवला आहे.
याबाबत ३ ते ४ वेळा मनपाकडे अर्ज करूनही कोणतीही कारवाई झाली नाही, असे गायकवाड यांनी सांगितले. विनोद पाटील त्याचे कुटुंब घेऊन आज रोजी त्यांच्या जागेवर बांधलेल्या अनधिकृत घरात राहत आहे.
गायकवाड यांनी आणि त्यांच्या भाचीने विनोद पाटीलला समजावण्याचा प्रयत्न केला असता, त्याने जातीला लज्जास्पद वाटेल अशा घाणेरड्या शिवीगाळ केल्या, तसेच भाचीसमोर कपडे वगैरे काढून घाणेरडे बोलला असल्याचा गंभीर आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. तसेच, विनोद पाटीलची पत्नी सौ. हेमांगी (राणी) विनोद पाटील, त्याची भावाची पत्नी सौ. सुनीता विकास पाटील, आणि त्याची आई नामे. गंगुबाई पंढरीनाथ पाटील या घरात घुसून भाचीला शिवीगाळ व मारहाण करतात आणि “तुमच्याकडून संपूर्ण जागाच खाली केल्याशिवाय राहणार नाही. तू येथून कसे काय जात नाही आता बघच?” अशा धमक्या देत आहेत.
याशिवाय, “तुम्हाला जर तुमची जागाच हवी असेल तर मला २ लाख रुपये दिले तरच जागा खाली करून देऊ, नाहीतर तुझ्याकडून जे होईल ते करून घे. तू अथवा तुझी भावाची मुलगी पोलिसात अथवा कुठेही गेले तरी माझे कुणीच काही वाकडे करणार नाही. माझे वरपर्यंत सर्व अधिकाऱ्यांशी हात पोहोचलेले आहे,” अशा धमक्याही दिल्या जात असल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे.
वामन गायकवाड यांनी जिल्हाधिकारी महोदयांना कळकळीची विनंती केली आहे की, संबंधित व्यक्तीने त्यांच्या जागेवरील अनधिकृत ताबा सोडून ते बांधकाम पाडण्याची समज द्यावी आणि त्यांना न्याय मिळवून द्यावा. जर १० दिवसांच्या आत न्याय न मिळाल्यास, ते त्यांची वृद्ध पत्नी आणि भाचीसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.