यावल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील कोरपावली गावातून एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. गावाबाहेरील सांडपाण्याच्या खड्ड्यात पडून चिखलात गुदमरून एका १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने गावात शोककळा पसरली असून, यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जयेश संतोष महाजन (वय १८, रा. कोरपावली, ता. यावल) हा एका गरीब कुटुंबातील तरुण होता. शेळ्या-मेंढ्या चारून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. काल, ८ जून रोजी संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. कोरपावली गावाबाहेरील जुने कोरपावलीकडून यावलकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या सांडपाण्याच्या मोठ्या खड्ड्यात एक शेळी पडली. त्या शेळीला वाचवण्यासाठी जयेश खड्ड्यात उतरला. मात्र, त्याचा पाय घसरला आणि तोल गेल्याने तो सांडपाण्याच्या खड्ड्यातील चिखलात रुतत गेला व गुदमरून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
जयेश खड्ड्यात पडल्याचे वृत्त कळताच, गावातील सर्व ग्रामस्थांनी त्याला वाचवण्यासाठी तात्काळ धाव घेतली. अथक प्रयत्नांनंतर त्याला खड्ड्यातून बाहेर काढण्यात आले. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या जयेशला कृउबाचे सभापती राकेश फेगडे, सरपंच विलास अडकमोल, सामाजिक कार्यकर्ते उमेश जावळे आणि इतर ग्रामस्थांनी तातडीने दुचाकीवरून यावल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले. परंतु, तेथील डॉक्टरांनी तपासणी अंती जयेशला मृत घोषित केले.
मृताच्या नातेवाईकांनी यावल पोलीस स्टेशनला या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. शेळ्या चारून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या तरुण मुलाच्या अकाली निधनाने कोरपावली गावावर शोककळा पसरली आहे.