जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नागेश्वर कॉलनीत रविवारी सायंकाळी एका अत्यंत हृदयद्रावक घटनेत एका चार वर्षांच्या बालकाचा मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात दुर्देवी मृत्यू झाला. अरविंद उर्फ बॉबी सचिन गायकवाड (वय-४) असे या मृत बालकाचे नाव आहे. या हल्ल्यात कुत्र्याने बालकाच्या चेहऱ्यासह मान आणि गळ्याचे लचके तोडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली होती. ही धक्कादायक घटना नागेश्वर कॉलनीत सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सचिन गायकवाड यांचा मुलगा अरविंद उर्फ बॉबी त्यांच्या घरासमोरील अंगणात खेळत होता. त्यावेळी परिसरात फिरणाऱ्या एका पिसाळलेल्या मोकाट कुत्र्याने अचानक त्याच्यावर हल्ला केला. कुत्र्याने बालकाच्या मानेवर, डोळ्याजवळ आणि गळ्यावर गंभीर जखमा केल्या, ज्यामुळे तो रक्तबंबाळ झाला. बालकाच्या किंकाळ्या ऐकून त्याच्या कुटुंबीयांसह शेजाऱ्यांनी धाव घेतली. त्यांनी काठीने कुत्र्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांच्यावरही हल्ला केला.
नागरिकांनी प्रसंगावधान राखून बालकाला कुत्र्याच्या तावडीतून सोडवले आणि तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर बालकाला मृत घोषित केले. या घटनेमुळे गायकवाड कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. डॉक्टरांनी बालकाला मृत घोषित करताच त्यांच्या कुटुंबियांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. ही बातमी कळताच गायकवाड यांच्या नातेवाईकांसह मित्रांनी जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती.
या घटनेनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी महापालिका प्रशासनाच्या बेजबाबदार कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. जोपर्यंत महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी येऊन योग्य आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत मृतदेहाचे शवविच्छेदन करू देणार नाही आणि मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली होती. या मोकाट कुत्र्याने बालकावर हल्ला केल्यानंतर त्याच परिसरात इतर १० ते १२ जणांवरही हल्ला करून त्यांना जखमी केल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.