जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात सण-उत्सवाच्या काळात आणि इतर वेळीही समाजकंटकांकडून शस्त्र बाळगून दहशत निर्माण करण्याच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन वेळोवेळी कठोर पावले उचलत आहे. याच पार्श्वभूमीवर, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बोदवड येथे तलवार आणि कोयता बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या एकाला जेरबंद केले आहे. ही कारवाई पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेची आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याच्या कटिबद्धतेची ग्वाही देते.
स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई
बोदवड तालुक्यातील बोदवड ते शेलवड आणि बोदवड ते शेलवड आणि महालक्ष्मी माता मंदिर, तपोवनकडे जाणाऱ्या रस्त्यावर एकजण हातात तलवार आणि कोयता घेऊन दहशत माजवीत आहे. ही माहिती मिळताच, पोलीस नाईक श्रीकृष्ण देशमुख यांनी तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना कळविले. त्यानुसार संदीप पाटील यांनी पथकाला कारवाई करण्याबाबतच्या सुचना देण्यात आल्या.
या पथकाने केली कारवाई
त्यानुसार जळगाव स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, पोहेकॉ प्रितम पाटील, पोलीस अंमलदार रविंद्र चौधरी यांना कारवाईच्या सुचना दिल्या. त्यानुसार पथकाने बोदवड ते शेलवड व महालक्ष्मी माता मंदिर, तपोवनकडे जाणाऱ्या रस्त्यावर कारवाई करत पुरुषोत्तम श्रावण वंजारी (वय-२६, रा.माळी वाडा, बोदवड, ता.बोदवड) हा त्याच्या ताब्यात तलवार आणि कोयता बाळगून दहशत माजवीत असताना आढळून आला. त्याच्या ताब्यातून एकूण साडेचार हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध बोदवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.