जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा आमदार बच्चू कडू यांच्या अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथील बेमुदत अन्नत्याग उपोषणाचा आज सातवा दिवस होता. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जळगाव ग्रामीणचे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उप जिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांनी शनिवारी सकाळी मोझरी येथे बच्चू कडू यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान प्रा. सोनवणे यांनी बच्चू कडू यांच्याशी चर्चा केली. त्यांनी बच्चू कडू यांना आपल्या तब्येतीची काळजी घेण्याचे आवाहन केले. तसेच, त्यांच्या शेतकरी आणि दिव्यांगांच्या हक्कांसाठी सुरू असलेल्या लढ्यात जळगाव ग्रामीणमधील शिवसैनिक खंबीरपणे त्यांच्यासोबत उभे असल्याची ग्वाही दिली.
शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी मिळावी, तसेच दिव्यांग आणि विधवा महिलांना ६ हजार रुपये मासिक मानधन मिळावे, अशा विविध मागण्यांसाठी बच्चू कडू उपोषणाला बसले आहेत. या सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत आपण बच्चू कडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असे प्रा. सोनवणे यांनी यावेळी स्पष्ट केले. बच्चू कडूंच्या या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत असून, त्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.