सावदा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सावदा येथील विद्यार्थिनी कांचन प्रमोद पाटील हिने महाराष्ट्र सीईटी (MHT-CET) परीक्षेत 99.63 टक्के गुण मिळवून एक मोठी शैक्षणिक झेप घेतली आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे संपूर्ण सावदा शहरासह परिसरात तिचे सर्वत्र कौतुक होत असून, ती येथील युवकांसाठी एक प्रेरणास्त्रोत बनली आहे.
कांचन हिने आपले जेईई आणि सीईटीसाठीचे शैक्षणिक मार्गदर्शन जळगाव येथील नामांकित बन्सल क्लासेसमधून घेतले. तिच्या अभ्यासाच्या यशस्वी वाटचालीबाबत बोलताना कांचन म्हणाली, “या यशामागे बन्सल क्लासेसच्या अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन आणि माझ्या आई-वडिलांचा अमूल्य पाठिंबा आहे.” अभ्यासाचे नियोजन ती अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने करत असे. दररोज क्लासेसनंतर सात ते आठ तास ती स्वतः अभ्यास करत होती.
MHT-CET चा अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीचे नीट विश्लेषण करून कांचनने आपली अभ्यासाची दिशा निश्चित केली. नियमितपणे मॉक टेस्ट्स सोडवून तिने स्वतःची तयारी अधिक मजबूत केली. त्या दरम्यान काही वेळा कमी गुण मिळाल्यामुळे मानसिक खचाखच झाली, तरीसुद्धा प्रयत्न आणि चिकाटीचा ध्यास तिने सोडला नाही. तिच्या सातत्यपूर्ण मेहनतीचा आणि समर्पणाचा परिपाक म्हणून तिला हे यश प्राप्त झाले आहे.
या यशामुळे कांचनवर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, सावदा व परिसरातून तिच्या अभिनंदनासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे. तिच्या या कामगिरीने सावदाचे नाव राज्यभर उज्वल केले असून भविष्यात ती अभियांत्रिकीच्या क्षेत्रात यशस्वी ठरणार असल्याचा विश्वास सर्वजण व्यक्त करत आहेत.