वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ-मुक्ताईनगर रोडवर वरणगावनजीक दिलीप मराठे यांच्या हॉटेलसमोर शनिवारी ७ जून रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडला. भरधाव वेगात असलेली स्विफ्ट कार डिव्हायडरला धडकून पलटी झाल्याने अमरावती येथील एका २६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी रात्री ८ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव अब्दुल झाकीर अब्दुल शकील (वय २६, रा. अमरावती) असे आहे. अब्दुल हा स्विफ्ट डिझायर (एमएच २७ बीई ३७२०) या कारने प्रवास करत होता. महामार्गावर गाडी चालवताना त्याचे वेगावर नियंत्रण नव्हते, तसेच रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे गाडी थेट डिव्हायडरवर आदळली आणि पलटी झाली. हा अपघात इतका भीषण होता की, यात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि चालकाचा जागीच मृत्यू झाला.
या प्रकरणी गिरीश एकनाथ पाटील (वय ५०, रा. दर्यापूर, ता. भुसावळ) यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अमितकुमार बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ यासीन पिंजारी आणि प्रेमचंद सपकाळे हे पुढील तपास करत आहेत.