जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरवी शांत असणारी रविवारची सकाळ आणि सुट्टीचा दिवस असूनही, आज रविवार १ जून रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास जळगाव शहर महावितरणच्या सुरक्षाविषयक रॅली आणि वीज कर्मचाऱ्यांच्या सुरक्षा घोषणांनी दुमदुमून गेले. ६ जून २०२५ रोजी महावितरणचा २०वा वर्धापन दिन साजरा होत आहे. या महत्त्वाच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर, महावितरणने ‘शून्य वीज अपघात’ या कल्पनेतून १ जून ते ६ जून दरम्यान वीज सुरक्षा सप्ताह आयोजित केला आहे. याच सप्ताहाचा पहिला कार्यक्रम म्हणून, आज सकाळी जळगाव शहरात भव्य वीज सुरक्षा रॅली काढण्यात आली.
या रॅलीत महावितरणचे मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या नेतृत्वात सागर पार्क येथून सुरूवात करण्यात आली. रॅलीने अजिंठा चौक, डी-मार्ट रोड मार्गे काव्यरत्नावली चौकातून वाटचाल केली आणि पुन्हा सागर पार्क येथे येऊन तिचा समारोप झाला.
या रॅलीत शेकडो वीज कर्मचारी सहभागी झाले होते. त्यांच्या हातात वीज सुरक्षेचे महत्त्व सांगणारे फलक आणि हँडी पोस्टर्स होते. “शून्य वीज अपघात”, “जीव वाचवा, सुरक्षित राहा”, “वीज वापरताना सावधान”, अशा अनेक घोषणांनी संपूर्ण शहर अक्षरशः दुमदुमून गेले. कर्मचाऱ्यांच्या उत्साहपूर्ण घोषणांनी आणि शिस्तबद्ध रॅलीने शहरातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. महावितरणचा हा उपक्रम वीज वापरकर्त्यांमध्ये सुरक्षिततेबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आला होता.
या रॅलीमध्ये मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्यासह पायाभूत आराखडा विभागाचे अधीक्षक अभियंता मनोज विश्वासे, जळगाव मंडळाचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील, मानव संसाधन विभागाचे सहाय्यक मुख्य व्यवस्थापक अशोक केदारे यांच्यासह इतर अधिकारी, कार्यकारी अभियंता, वीज तंत्रज्ञ, आणि जनमित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वीज सुरक्षा सप्ताहात पुढील सहा दिवस विविध जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे.